कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास तेजस्वी, ओजस्वी, मानवतावादी व अखिल विश्वाला प्रेरणा देणारा आहे. शिवरायांचा अभ्यास करून जगातील अनेक महापुरुष त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात प्रचंड यशस्वी झालेले आहेत. पण शिवरायांचा इतिहास लिहिताना काही शिवद्वेष्ट्या समाज कंटकांनी त्यांना शूरवीर दाखवता दाखवता त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक चमत्काराचे व अनैतिहासिक घटना, व्यक्ती यांची पेरणी केली. अशा घटनांमुळे, व्यक्तींमुळे शिवरायांच्या कार्य कर्तुत्वावर, मानवतावादी विचारावर मर्यादा आणून त्यांना माणसातून उठवून चमत्कारी देवांच्या पंक्तीला बसवण्याचा दृष्टीहेतू त्यांनी साध्य केला. शिवरायांच्या प्रामाणिक भक्तानो शिवरायांना व शिवविचाराला जगातील प्रत्येक माणसापर्यंत पोहचवायचे असेल तर अशी चमत्कारिक घटना, चुकीच्या व्यक्ती यांना ताबडतोब शिव चरित्रातून हाकलून लावले पाहिजे.
शिव चरित्रातील असेच एक अनैतिहासिक पात्र म्हणजे वाघ्या कुत्रा. इतिहासातील कोणत्याही समकालीन, उत्तरकालीन किंवा वस्तुनिष्ठ साधनामध्ये या वाघ्याचा संदर्भ सापडत नसतानाही त्याची समाधी शिवप्रभूंच्या समाधीपेक्षाही उंच ? आपल्या प्राणप्रिय शिवप्रभूंच्या बदनामीचे षडयंत्र तर नसेल ना ? होय....होय, बदनामीचे षडयंत्रच. पहा, इतिहास काय म्हणतो.
शिवरायांचा इतिहास पाहता त्यांचे वाघ्या नावाचे कुत्रे होते याचा लिखित संदर्भ मिळत नाही. रायगडावर ज्या काही दंतकथा सांगितल्या जातात त्यामध्ये या शिवरायांच्या चितेत उडी घेणाऱ्या कुत्र्याच्या दंतकथेचा उल्लेख आहे. ही दंतकथा लिखित स्वरुपात पहिल्यांदा इसवी सन १९०५ मध्ये प्रकाशित झालेल्या ची. ग. गोगटे यांच्या “महाराष्ट्र देशातील किल्ले” या पुस्तकात दिलेले आहे. यामध्ये लिहिले आहे....
“महाराजांचा अंत झाल्यावर त्यांचे प्रेत पालखीत घालून दहन भूमीवर आणले, त्यावेळी त्यांचा आवडता कुत्राही बरोबर आला होता. दहनविधी आटोपल्यावर पालखीत महाराज नसून ती रिकामी चालली आहे असे त्या कुत्र्याने पाहताच त्याने धावत जावून एकदम महाराजांच्या चितेत उडी घेतली व आपणास जाळून घेतले.” या कुत्र्याच्या समाधीच्या संदर्भात इ.सं. १८८५ पासून रायगडावर आलेल्या कोणत्याही इंग्रज किंवा एतद्देशीय व्यक्तीने उल्लेख केलेला नाही. त्यांनी काढलेल्या शिवसमाधीच्या किंवा रायगडच्या नकाशामध्ये या कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख नाही. एवढेच नाही तर इ. स. १९२९ साली प्रकाशित झालेल्या “राजधानी रायगड” या रायगडावरील अभ्यासपूर्ण पुस्तकामधेही या कुत्र्याचा किंवा त्याच्या समाधीचा उल्लेख नाही. या कुत्र्याची स्थापना या ठिकाणी इ. स. १९३६ मध्ये झाली. त्या अगोदर या संदर्भातील ती दंतकथा होती हे निश्चित.
मग प्रश्न उरतो इ.स. १९२६-२७ मध्ये शिवसमाधीचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानंतर जवळजवळ ९-१० वर्षांनी या ठिकाणी हा कुत्रा स्मारक रुपाने स्थानापन्न झाला कसा ? याचा शोध घेता पुढील गोष्टी लक्षात येतात. शिव समाधीचा जीर्णोद्धार झाल्यानंतरही रायगड स्मारक समितीचे स्मारकासाठी पैसे जमा करणे सुरूच होते. याचवेळी महाराष्ट्रात ब्राम्हण-ब्राम्हणेतर वादही जोरात सुरु होता. शेवटी शिवरायांविषयी असणाऱ्या या पवित्र कार्यामाधेही हा वाद डोकावला आणि शिवरायांच्या समाधीसमोर त्यांच्या महाराणी सोयराबाई साहेब यांची समाधी असण्याची शक्यता असणाऱ्या चौथाऱ्याच्या ठिकाणी एका काल्पनिक कुत्र्याची समाधी उभी राहिली.
या कुत्र्याचे “वाघ्या” असे बारसे राम गणेश गडकऱ्यांच्या “राजसंन्यास” या छत्रपती संभाजी राजांना बदनाम करणाऱ्या या नाटकात झाले.
“वाघ्या कुत्रा प्रकरणात शिवप्रेमी होळकरांनाही बदनाम करण्याचे षडयंत्र” -
पण आज याविषयी जी कथा सांगण्यात येते आणि आधुनिक काळामध्ये रायगड किल्ल्यावर लिहिलेल्या प्रत्येक पुस्तकामध्ये जी आख्यायिका दिलेली असते, त्या खोटया अख्यायीकेच्या जन्माची मुळे ब्राम्हणेतर द्वेषात सापडते. या आख्यायिकेनुसार – “स्मारक समितीतील काही मंडळी स्मारकासाठी निधी जमवायला इंदूरला होळकरांकडे गेली होती. होळकर संस्थानिक असल्यामुळे इंग्रजांना घाबरत होते. शिवरायांच्या स्मारकाला पैसे देणे इंग्रजांना आवडणार नाही याची त्यांना मनोमन खात्री होती. तेव्हा ही शृंगापत्ती टळावी म्हणून त्यांनी प्रथमतः समितीच्या सभासदांची गाठ घेण्यास टाळाटाळ केली. कारण सांगितले, महाराज सुतकात आहे. कसले सुतक तर महाराणी साहेबांचे लाडके कुत्रे गेले होते त्याचे सुतक ! पण स्मारक समितीची माणसे चाणाक्ष आणि चिकाटीची असावी. आपली गरज आणि महाराजांची व्यावहारिक अडचण लक्षात घेवून त्यांनी अफलातून तोडगा सुचवला. महाराजांनी त्यांच्या लाडक्या कुत्र्याचा पुतळा उभारावा. कुत्र्याचा पुतळा उभारण्यात तर काही इंग्रजद्रोह नाही; इंग्रज अवकृपेची भीती नाही ! तोडगा उपयोगी पडला. होळकरांनी देणगी दिली, समितीने काल्पनिक कुत्र्याचा पुतळा उभारला !”
आता ही आख्यायिका कुणी सांगितली त्याच्या बुद्धीमतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच. इंदूरच्या होळकरांच्या गादीवर तुकोजी होळकर होते. ते शिवप्रेमी होते. त्यांनी पुण्यातील राजर्षी शाहूंनी पायाभरणी केलेल्या शिवस्मारकाला मोठी मदत केली होती. केळूसकरांनी लिहिलेले शिवचरित्र स्वताच्या पैशाने जगभरातील ग्रंथालयांना मोफत वाटले होते. ते होळकर म्हणे रायगडावरील स्वतः इंग्रज सरकारच्या पुढाकाराने निर्माण होणाऱ्या शिव स्मारकाला देणगी देण्यास घाबरत होते. खरे तर होळकर हे कोणालाही घाबरत नव्हते. कारण ही कथाच खोटी आहे.
काल्पनिक वाघ्याची समाधी |
.......राम गणेश गडकरी यांच्या “राजसंन्यास” नाटकावरून.
हा मजकूर फलकावर लिहिण्यामागे चांगल्या भावना असाव्या असे वाटत नाही. कारण “राजसंन्यास” हे नाटक संभाजी महाराजांना बदफैली दाखवण्यासाठी लिहिले आहे. त्या नाटकातील कुत्रा हा सत्य स्वरुपात या ठिकाणी आहे म्हणजे त्या नाटकात रंगवलेला संभाजीही सत्य आहे असे रायगडला भेट देणाऱ्या व्यक्तींना वाटावे यासाठी हा राजसंन्यासातील मजकूर या ठिकाणी कोरलेला असावा.
काल्पनिक कुत्रा शिवरायांच्या समाधी समोर तसाच ठेवायचा का ? हे रायगडचे राजकारण असेच चालू द्यायचे का ? या प्रश्नांचा विचार शिवप्रेमींनी मनाची आणि बुद्धीची कवाडे उघडी ठेवून कारणे गरजेचे आहे.
(संदर्भ- शिव छत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध, पृष्ठ क्र. ४६ ते ५२ इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, कोल्हापूर.)
“जर सईबाई साहेबांचा मृत्यू रायगडी झाला असेल आणि राज्याभिषेकानंतर महाराजांच्या हयातीतच झाला असेल तर निश्चितपणे सईबाई साहेबांचे स्मारक म्हणून दगड, चिरा, चौथरा, वृंदावन यापैकी काहीतरी रायगडी असलेच पाहिजे. यादृष्टीने शोध घेतला असता त्याचाही शोध लागतो. शिवाजी महाराजांच्या समाधीपासून १५ ते १८ फुटावर पूर्व आग्नेय दिशेस ज्या चौथऱ्यावर आज कुत्र्याचे स्मारक उभे आहे तो चौथरा हाच सईबाई साहेबांच्या स्मारकाचा चौथरा होय. दुर्दैवाने आजही त्याच्यावर कुत्र्याची प्रतिमा विराजमान आहे. हा तमाम मराठी जनतेचा सांस्कृतिक, ऐतिहासिक अपमान आहे. सईबाई साहेबांच्या स्मारकाची विटंबना आहे. ती थांबवण्यासाठी कुत्र्याची प्रतिमा ताबडतोब दूर केलीच पाहिजे.”
(संदर्भ- अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज १ , इतिहास संशोधक अनंत दारवटकर)
“दादोजी कोंडदेव, जेम्स लेन, रामदास, वाघ्या कुत्रा यांच्या माध्यमातून ब्राम्हणांनी बहुजनांची प्राणप्रिय राजमाता व महाराणी यांची विटंबना केली आहे.”
जाहीर आवाहन : या कुत्र्याविषयी कुणाकडे ऐतिहासिक पुरावा असेल तर त्यांनी तो शिव भक्तासमोर सादर करावा.
सौजन्य
"शिवसाम्राज्य शक्ती महाराष्ट्र शिवराष्ट्र"
जय जिजाऊ,
कुत्रा समकालीन असल्याचा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न होतंय...
गदगच्या सावित्रीबाई हिने महाराजांचा सन्मान म्हणून जे शिल्प बनवले,त्यात कुत्र्याचे चित्र असल्याचे म्हंटले जाते,आणि त्याचा आधार घेऊन तोच वाघ्या कुत्रा असा म्हंटले जाते,ते खोटे आहे कारण,
१.तो नक्की कुत्रा होता का हे स्पष्ट होत नाही,ते चित्र नक्की कोणत्या प्राण्याचे यात संधीगद्त्पणा आहे.
२.कुत्रा नक्की कधी महाराजांनी पाळला होता याची माहिती नाही,कारण कुत्र्याची वयोमर्यादा १२-१४ वर्षाची असते,
३.त्या शिल्पात एका मुलाचा देखील उल्लेख आहे मग ते नक्की कोण ?
४.राजाराम महाराजांनी ज्या प्रमाणे सिंधुदुर्ग किल्ल्यात कोळ्याच्या वेशात मूर्ती करून घेतली तसाच आदर ठेऊन धारवाड या ठिकाणी सावित्रीबाईने शिल्प बनून घेतले इतकेच...
५.पुतळा महाराजांचा नाही कुत्र्याचा हलवला आहे,प्रेम महाराजांवर राहू द्या,काल्पनिक कुत्र्यावर नको.
६.द्वेष कुत्र्याचा नाही,खोट्या मानसिकतेचा आहे.
७.पुराव्यावर आधारित सत्य जे असेल ते स्वीकारणे सुसंगत ठरेल.