Friday, February 18, 2011

रयतेवर जिवापाड प्रेम करणारा राजा

छत्रपती शिवाजी महाराज यांनी लिहिलेल्या पत्रांमधून त्यांची संवेदनशीलता, प्रेम, शिस्त असे अनेक गुण दिसतात. त्याविषयी शिवजयंतीनिमित्त (ता. १९) एक दृष्टिक्षेप.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या निर्दालनासाठी हाती तलवार घेतली. हा लढायांचा इतिहास तर आपणा सर्वांना ज्ञात आहेच. ढाल-तलवारीच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजीराजांनी रयतेबद्दल व्यक्त केलेल्या भावना, प्रजेच्या सुरक्षिततेसाठी, कल्याणासाठी घेतलेले निर्णय, काळजी, कळवळा त्यांच्या पत्राद्वारे आपणास प्रकर्षाने जाणवते. छत्रपती शिवाजीराजांनी रयतेवर केलेले जिवापाड प्रेम त्यांच्या विविध पत्रांवरून आपणास समजते.

२३ ऑक्‍टोबर १६६२ रोजी शिवाजी महाराजांनी सर्जेराव जेधे यांना एक पत्र लिहिलेले आहे. शाहिस्तेखानाचे संकट स्वराज्यावर येत आहे. त्याप्रसंगी रयतेची कशाप्रकारे काळजी घ्यावी, हे महाराजांनी सांगितलेले आहे. ""मोगल प्रस्तुत तुमच्या तपियात धावणीस येताती म्हणौन जासुदानी समाचार आणिला आहे. तरी तुम्हास रोखा अहडताच तुम्ही तमाम आपलेतपियात गावचा गाव ताकिदी करून माणसे, लेकरेबाळे समतर तमाम रयेति लोकास घाटाखाले बाका जागा असेल तेथे पाठविणे. ये कामात हैगै न करणे ..... गावचा गाव हिंडोनु रातीचा दिवस करून लोकाची माणसे घाटाखाली जागा असेल तेथे पाठवणे. या कामास एक घडीचा दिरंग न करणे.'' रयतेच्या रक्षणासाठी एक क्षणाचाही विलंब करू नका, अशा सूचना शिवरायांनी प्रस्तुत पत्रात सर्जेराव जेधे यांना दिलेल्या आहेत.

१९ मे १६७३ रोजी शिवाजी महाराजांनी चिपळूण येथील आपल्या जुमलेदार, हवालदार आणि कारकुनांना एक पत्र लिहिलेले आहे. यातून शिवरायांना शेतकऱ्यांबद्दल किती कळवळा होता, हे स्पष्टपणे लक्षात येते. लष्कराची छावणी चिपळूण येथे पडलेली असताना आपल्या अधिकाऱ्यांनी कशी काळजी घ्यावी, याबाबत लिहिलेल्या पत्रातील काही भाग "".......... पागेस अधिक बैठी पडली; परंतु जरूर जालें त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास, तुम्ही मनास ऐसा दाणा, रातीब, गवत मागाल, असेल तोवरी धुंढी करून चाराल.

नाहीसें जालें म्हणजे मग काही पडल्या पावसात मिळणार नाही, उपास पडतील, घोडी मरायास लागतील म्हणजे घोडी तुम्हीच मारिली ऐसे होईल व विलायतीस तसवीस देऊ लागाल. ऐशास, लोक जातील कोण्ही कुणब्याचे थील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर धरून जीवमात्र घेऊन राहिले आहेत, तेहि जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल, की मोगल मुलकांत आले त्याहुनहि अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल! ....... रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाही. ........ कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाही. ........ हाली उनाळ्याला आहे ........ कोण्ही आगट्या करितील, कोण्ही भलतेच जागा चुली, रंधनाळा करितील .......... आगट्या जाळीता, अगर रात्रीस दिवा घरांत असेल, अविस्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. ........'' शिवरायांचे हे पत्र मुळातूनच वाचण्यासारखे आहे. लष्करातील लोकांनी काटकसरीने वागावे. स्थानिक रयतेला त्रास देऊ नये.
शेतकऱ्यांच्या काडीलादेखील हात लावू नये; अन्यथा रयत म्हणेल की मोगलापेक्षा तुम्ही वाईट आहात. आगीपासून धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना शिवरायांनी आपल्या सैनिकांना दिलेल्या आहेत. यातून शिवरायांचा मानवतावाद प्रकर्षाने जाणवतो.

शिवरायांनी शेतकरी कष्टकरी, श्रमकरी वर्गाचे हित जोपासले. आपल्या सैनिकांवर सहकाऱ्यांवर जिवापाड प्रेम केले. २ सप्टेंबर १६६० रोजी शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधे यांना एक पत्र लिहिलेले आहे. कान्होजी जेधे आजारी असल्याची माहिती मिळाल्यामुळे महाराज त्यांना लिहितात, ""औसध घेऊन शरीरासी आरोग्य होई ते करणे. उपचाराचे विशी आलस न करणे... औषधोपचार घेऊन बरे होणे. त्याबाबत हयगय करू नये,'' असा अत्यंत मायेचा सल्ला शिवरायांनी कान्होजी जेधेंना दिलेला आहे.

शिवाजी महाराजांची अनेक पत्रं आहेत. त्यातून शिवरायांची संवेदनशीलता, प्रेमळपणा, वक्तशीरपणा, शिस्त, व्यवस्थापन, धर्मनिरपेक्षता, नैतिकता, प्रशासनव्यवस्था याची माहिती मिळते. शिवाजी महाराजांच्या पत्रावरून लक्षात येते की, शिवरायांचे स्वराज्य हे रयतेचे लोककल्याणकारी राज्य होते.

regards
SHRIMANT KOKATE SIR

No comments:

Post a Comment